यात्रोत्सव

महाशिवरात्रीला यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या दिवशी लाट तोडली जाते. ही लाट प्रथम शिरगाव नंतर कुंभार्ली नंतर पोफळी या तीन गावच्या मानाप्रमाणे वर्षानुवर्षे परंपरेने तोडली जाते. प्रथम तीन गावचे प्रमुख व जाणकार मंडळी काही दिवस अगोदर ज्या गावात लाट असते त्या ठिकाणी लाटेची पाहणी करतात ती योग्य आहे, पाहिजे त्या मापाची सरळ आहे हे पाहून लाट निश्चित केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी पोफळीतील मानकर मोठ्या भावाकडे म्हणजेच शिरगावातील मानकरऱ्यांकडे जातात. त्याच वेळी तीन गावातील मानकरी व ग्रामस्थ लाटेच्या ठिकाणी जमतात. त्यावेळी मानकरांच्या हस्ते पूजा करून आराजमान होवून पहिला घाव मानकर घालतात. त्यानंतर ती लाट पोफळीतील सुतार सुंदर तासून तयार करतात. यात्रेच्या आदल्या दिवशी ढोल ताशा सनईच्या गजरामध्ये शिरगांवकर ग्रामस्थ तीन गावच्या समवेत मंदिरापर्यंत लाट आणली जाते. यात्रेनिमित्त मंदिर व मंदिर परिसरामध्ये मंडप व आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. मंदिर फुलांनी सजविले जाते. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा हा यात्रेचा प्रमुख दिवस. या दिवशी सकाळी देवीला अभिषेक घातला जातो. रुपी लावून सुंदर जरीकाठी नऊवारी साडी नेसवून दागिने घालून फुलांचा हार, वेण्यानी सजविले जाते. नंतर देवीची पूजा व आरती होते. तीन गावचा आरजमाप चौखांबामध्ये झालेवर लाटेची यथासांग पूजा होते व त्यानंतर लाट चढविली जाते. नंतर भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले केले जाते. सायंकाळी ३.०० ते ४.०० या वेळी देवीचा मांड भरला जातो व त्यानंतर ढोल ताशा सनईच्या गजरात धुपारतीसह मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून लाटेच्या पाच प्रदक्षिणा होतात. प्रदक्षिणा झाल्यानंतर किंवा लाट फिरल्यानंतर मांडाचे विसर्जन शिरगाव-कुंभार्ली-पोफळी या तीन गावचे प्रमुख मानकरी यांना प्रथम मानाचा विडा देवून नंतर अठरा कोंभातील मानकरी यांना विडे दिले जातात. नंतर उपस्थित चौखांबातील तीन गावातील ग्रामस्थ, पाहुणे, सगे-सोयरे यांना विडा देवून त्यांचा मान राखला जातो. नित्यनियमाप्रमाणे सायंकाळी ५.०० ते ७.०० वाजता हरिपाठाचा कार्यक्रम होतो व त्यानंतर महाकाली नवतरुण क्रीडा मंडळ, कुंभार्ली यांनी भरविलेल्या कब्बडीचा अंतिम सामना व बक्षिस वितरण कार्यक्रम होतो. रात्री करमणुकीचा कार्यक्रम म्हणून लोकनाट्य तमाशाचे आयोजन केलेले असते. यात्रे निमित्ताने दूरवरून भाविक मोठ्या श्रद्धेने देवींच्या दर्शनासाठी येतात, यात्रेमध्ये खेळण्याची दुकाने, विविध खाद्य पदार्थांची दुकाने, पूजा अर्चा साहित्यांची दुकाने यांनी परिसर फुलून गेलेला असतो. दरवर्षी यात्रेनिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून मोफत आरोग्य शिबीर, रुग्णवाहिका अग्निशमन दल व्यवस्था, अशा प्रकारच्या विविध सोयी-सुविधा तीन गांव कमिटीच्या वतीने केली जाते. यात्रेनिमित्त देवीचा मांड भरण्याच्या वेळी एक सामाजिक बांधीलकी म्हणून गुणवंतांचा सत्कार केला जातो. त्याचप्रमाणे यावर्षी तीन गाव मधील स्थानिक कलाकारांचा मनोरंजनाचा कार्यक्रम रात्रौ ८.०० ते १०.०० वा. दरम्यान आयोजित केलेला आहे.